APAAR ID Card apply राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत देशाच्या शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येत आहेत. या धोरणात अभ्यासक्रमातील सुधारणा, तसेच कार्यपद्धतीतील बदलांचा समावेश आहे. या धोरणातील “अपार” हा उपक्रम कार्यान्वित करण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा स्वतःचा ओळख क्रमांक दिला जातो आणि त्याचबरोबर डिजिलॉकरची सुविधा देखील मिळते. ‘एक देश, एक विद्यार्थी ओळख’ या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
”अपार’ म्हणजे काय?
‘अपार’ म्हणजे ‘ऑटोमेटेड पर्मनंट अॅकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री’ याचे संक्षिप्त रूप आहे. अपार हे एक १२ अंकी कायमस्वरूपी ओळखक्रमांक असणार आहे, जो देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेपासून ते उच्च शिक्षणापर्यंत दिला जाणार आहे.
सध्या ‘युनिफाइड डिस्ट्रिक्ट अँड इन्फर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस’ (यू-डायस प्लस) नावाच्या पोर्टलवर विद्यार्थ्यांची माहिती नोंदली जाते, आणि त्यात प्रत्येक विद्यार्थ्याचा व्यक्तिगत शैक्षणिक क्रमांक (पीईएन) दिला जातो.
अपार आयडी हा ‘पीईएन’चा पर्याय म्हणून वापरण्यात येईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवासाशी संबंधित सर्व माहिती एका ठिकाणी संकलित ठेवता येईल.
”अपार’ या उपक्रमाचा मुख्य उद्देश प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनीची शैक्षणिक तसेच शिक्षणेतर प्रगतीसंबंधीची माहिती डिजिलॉकरमध्ये सुरक्षित ठेवणे आहे. या डिजिलॉकरमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचा स्वतंत्र ओळख क्रमांक असणार आहे, ज्यामुळे त्यांची माहिती एकाच ठिकाणी सुरक्षित राहील.
शैक्षणिक कागदपत्रे सहजपणे डिजिलॉकरच्या माध्यमातून उपलब्ध होतील. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याने शाळा बदलली तरी त्याला नव्या शाळेत सगळी कागदपत्रे पुन्हा जमा करण्याची गरज पडणार नाही, कारण त्याची सर्व माहिती डिजिलॉकरमध्ये सुरक्षित असेल.
त्याचप्रमाणे, नोकरीसाठी अर्ज करताना संबंधित कंपनीला उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेची खातरजमा करण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागणार नाहीत, कारण सगळी कागदपत्रे त्याच डिजिलॉकरमध्ये उपलब्ध असतील.
अपार ओळख क्रमांक कसा मिळवायचा, याची सोपी माहिती खालीलप्रमाणे आहे:
शाळांनी विद्यार्थ्यांसाठी अपार क्रमांक तयार करण्यासाठी पालकांशी संपर्क साधावा. पालकांनीही याबाबत जागरूक असणे गरजेचे आहे. अपार क्रमांक मिळवण्यासाठी काही महत्त्वाची माहिती द्यावी लागते, जसे की:
- विद्यार्थ्याचा यू-डायस नोंदणी क्रमांक
- विद्यार्थ्याची जन्मतारीख
- विद्यार्थ्याचे लिंग
- संपर्कासाठी मोबाइल क्रमांक
- आईचे नाव आणि वडिलांचे नाव
- आधार कार्डवरील नाव आणि आधार क्रमांक
महत्त्वाचे म्हणजे, विद्यार्थ्याचे नाव यू-डायस क्रमांक व आधार कार्डावरील नावाशी जुळले पाहिजे. जर विद्यार्थी अठरा वर्षांखालील असेल, तर या प्रक्रियेसाठी पालकांची लेखी संमती असणे आवश्यक आहे.
शाळांनी या सर्व माहितीची योग्यरीत्या खातरजमा करावी. एकदा अपार आयडी तयार झाल्यावर, तो डिजिलॉकरशी जोडला जाईल, ज्याला ‘एज्युलॉकर’ असेही म्हणतात.
डिजिलॉकर म्हणजे काय?
डिजिलॉकर हे भारत सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाचा एक भाग आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने नागरिकांसाठी डिजिलॉकर हे क्लाउडवर आधारित एक प्रकारचे ‘डॉक्युमेंट वॉलेट’ विकसित केले आहे. याचा मुख्य उद्देश म्हणजे शासकीय कामकाजात कागदपत्रांचा वापर कमी करणे आणि ही प्रक्रिया डिजिटल स्वरूपात करणे.
डिजिलॉकरमधील सुविधा
डिजिलॉकरमध्ये नागरिकांची अधिकृत कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे सुरक्षित ठेवली जातात. ही कागदपत्रे गरजेनुसार डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिली जातात. यामुळे कागदपत्रे बरोबर नेण्याची गरज नसते, कारण डिजिलॉकरमध्ये ती सुरक्षितपणे उपलब्ध असतात.
डिजिलॉकरमधील कागदपत्रांची वैधता
डिजिलॉकरमधील कागदपत्रे भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा २००० नुसार अधिकृत आणि वैध मानली जातात.
सध्या ३४ कोटींहून अधिक ‘अपार आयडी’ (एपीएआर) नोंदण्या झाल्या आहेत. महाराष्ट्रातही यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील शाळांना २० नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, दिवाळीच्या सुट्या आणि विधानसभा निवडणुकांमुळे हे काम थोडे थांबले आहे.
‘अपार’ ओळख क्रमांक डिजिलॉकरशी जोडलेला आहे, त्यामुळे डिजिलॉकरबद्दल जनजागृती करणे ही शाळा व शासकीय संस्थांसमोरील एक मोठी जबाबदारी बनली आहे. काही शासकीय कार्यालये अद्याप डिजिलॉकर वापरत नाहीत, यामुळे केवळ ‘अपार’ क्रमांक तयार करून हा उपक्रम थांबेल की डिजिलॉकरचा पूर्ण वापर केला जाईल, हे अजून स्पष्ट नाही.