काही दिवसांपासून रस्ते अपघातांची संख्या खूप वाढली आहे. गाडी चालवताना किंवा रस्ता ओलांडताना आपली काळजी घेण्याचा सल्ला नेहमी दिला जातो, पण अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि त्याचा परिणाम गंभीर अपघातांमध्ये होतो. एक छोटीशी चूक देखील आपल्या जीवावर घातक ठरू शकते, म्हणून प्रत्येक वेळी सावधगिरी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. सोशल मीडियावर अनेक वेळा अपघातांचे व्हिडिओज शेअर केले जातात. सध्या असेच एक भयंकर अपघाताचे व्हिडिओ व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर सध्या एका अपघाताचा व्हिडिओ चर्चेत आहे. यात एक तरुणी रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीने तिला जोरदार धडक दिली.
तरुणीचा सगळा भर मोबाईलवर होता, त्यामुळे तिने रस्त्यावरच्या रेड सिग्नलकडे लक्ष दिले नाही. रस्ता ओलांडताना समोरून येणाऱ्या गाडीची तिला जाणीव झालीच नाही.
गाडीची धडक इतकी जोरदार होती की हा व्हिडिओ पाहून अनेक लोकांना धक्का बसला आहे.
ही घटना इतरांसाठी एक धडा बनली आहे, ज्यामुळे रस्ता ओलांडताना मोबाईलचा वापर न करण्याचे महत्त्व अधोरेखित होते.
काय आहे व्हिडिओत?
एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुणी रस्त्यावरून चालताना दिसते. ती तिच्या मोबाइलमध्ये इतकी गुंग झालेली असते की, रस्त्यावरील रेड सिग्नलकडे तिचे लक्ष जात नाही.
तरुणी सिग्नलकडे दुर्लक्ष करून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करते, तेवढ्यात सिग्नल ग्रीन होतो आणि एका वेगाने येणाऱ्या कारने तिला जोरदार धडक दिली जाते.
या धडकेमुळे तरुणी हवेत उडून रस्त्यावर पडते आणि तिच्या हातातील मोबाइलही दूर फेकला जातो.
अपघातानंतर कारचालक लगेच गाडी थांबवतो आणि तिच्या स्थितीची चौकशी करण्यासाठी बाहेर येतो.
तरुणी थोड्या वेळाने स्वतःला सावरते आणि उभी राहण्याचा प्रयत्न करते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एवढ्या मोठ्या अपघातातूनही ती सुखरूप बचावते.
एक्स प्लॅटफॉर्मवरील @OnlyBangersEth या अकाऊंटवरून एक अपघाताचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 50 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेक लोकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आपले विचार मांडले आहेत.
एका युजरने कमेंटमध्ये लिहिले आहे, “फोनवर असताना या पिढीकडे जगण्याचे कौशल्यच नाही.” तर दुसऱ्या युजरने मत व्यक्त केले, “ही घटना पूर्णपणे तिच्या हलगर्जीपणामुळे घडली आहे.”