Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून, केंद्रीय निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभाग घ्यावा, यासाठी आयोगाने विविध उपाययोजना आखल्या आहेत.
मतदान अधिक सुलभ करण्यासाठी आयोगाने मतदारांसाठी नवी सोय उपलब्ध करून दिली आहे. आता मतदार यादीतील नाव शोधणे आणि मतदान केंद्राचा तपशील जाणून घेणे अधिक सोपे झाले आहे.
निवडणूक आयोगाने ‘वोटर हेल्पलाइन’ या अॅपद्वारे मतदारांना ही सुविधा दिली आहे. या अॅपमुळे मतदारांना त्यांच्या नावाची माहिती आणि मतदान केंद्राचा पत्ता पटकन मिळू शकतो. त्यामुळे मतदानाच्या दिवशी होणारा गोंधळ टाळता येईल.
- वोटर हेल्पलाईन अॅप डाऊनलोड करा:
सर्वप्रथम, प्ले स्टोअरवर जाऊन ‘वोटर हेल्पलाईन’ हे अॅप डाऊनलोड करा. - रजिस्ट्रेशन करा:
तुम्ही नवीन युजर असाल, तर ‘न्यू युजर’ पर्यायावर क्लिक करून तुमची नोंदणी करा. - गेस्ट युजर म्हणून लॉगिन:
जर नोंदणी न करायची असेल, तर तुम्ही गेस्ट युजर म्हणूनही लॉगिन करू शकता. - नाव शोधा:
लॉगिन केल्यानंतर अॅपच्या वरच्या भागात ‘Search your name in electoral roll’ हा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करा.
सर्च बॉक्सवर मिळणारे चार पर्याय:
सर्च बॉक्सवर क्लिक केल्यावर तुम्हाला मतदान यादीतील तुमचे नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी चार पर्याय दिसतील:
- मोबाईल क्रमांक वापरून शोध
- क्यूआर कोड स्कॅन करणे
- तुमची वैयक्तिक माहिती भरून शोध
- EPIC क्रमांक वापरून शोध
पहिला पर्याय: मोबाईल क्रमांक वापरून शोध
मोबाईल क्रमांकाने माहिती शोधण्यासाठी हा पर्याय निवडा. यामध्ये तुम्हाला तुमचे राज्य आणि मोबाईल क्रमांक भरायचा आहे. मोबाईल क्रमांक भरल्यावर एक ओटीपी येईल. तो ओटीपी टाकल्यानंतर तुमच्या नावाची संपूर्ण माहिती, जसे की तुमचे वय, पत्ता, मतदान यादीतील क्रमांक, आणि मतदान केंद्र, मिळेल.
दुसरा पर्याय (मतदान कार्डावरील क्यूआर कोड):
मतदान कार्डावर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करा आणि थेट तुमचा मतदान यादीतील क्रमांक आणि मतदान केंद्राची माहिती मिळवा.
तिसरा पर्याय (वैयक्तिक माहितीने शोध):
जर वरचे दोन पर्याय वापरण्यात अडचण येत असेल, तर ‘search by details’ वापरूनही माहिती मिळवू शकता. यासाठी तुमचे नाव, आडनाव, आई किंवा वडिलांचे नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि मतदारसंघ अशी माहिती भरावी लागेल. ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमचा मतदान क्रमांक आणि केंद्र दिसेल.
चौथा पर्याय (EPIC क्रमांक):
तुमच्याकडे EPIC क्रमांक असल्यास, तो भरूनही तुमचे मतदान केंद्र आणि क्रमांक जाणून घेऊ शकता.