मृत्यू ही अशी गोष्ट आहे जी माणसाच्या हातात नसते. आपल्याला कधी आणि कसा मृत्यू येईल, हे कुणालाही माहीत नसते. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते.
सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडिओ व्हायरल होतात, ज्यातून आपल्याला मृत्यूचे धोकादायक क्षण पाहायला मिळतात. एक छोटीशी चूकही माणसाला मृत्यूच्या उंबरठ्यावर नेऊ शकते.
आज व्हायरल झालेला हा व्हिडिओदेखील त्याचेच उदाहरण आहे, जिथे एका चुकीमुळे किती मोठा धोका निर्माण होऊ शकतो, हे दिसून येते.
सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खासगी रिसॉर्टमध्ये गेलेल्या तीन मैत्रिणींची दुर्दैवी घटना दाखवण्यात आली आहे.
स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना या तिघींचा एकाच वेळी मृत्यू होतो. ही संपूर्ण घटना रिसॉर्टमधील कॅमेरात कैद झाली आहे.
या तरुणींच्या मृत्यूचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर झपाट्याने पसरत आहे. त्यातील दृश्ये खूप भीतीदायक असून कोणालाही पाहून धक्का बसेल.
काय आहे प्रकरण?
मंगळुरूतील उचिला बीचजवळील एका खासगी रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये बुडून तीन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या मुलींची नावे निशिता एमडी (21), पार्वती (20), आणि कीर्तना (21) आहेत.
ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून, संबंधित मुली म्हैसूरच्या असल्याची माहिती आहे. त्यांच्या कुटुंबीयांना या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे.
स्विमिंग पूलसारख्या ठिकाणी घडणाऱ्या अशा घटना सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे होतात. त्यामुळे अशा ठिकाणी खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तीन मुलींपैकी निशिता नावाची मुलगी स्विमिंग पूलमध्ये उतरली, त्यावेळी हा अपघात घडला. निशिताला वाचवण्यासाठी पार्वती नावाच्या मुलीने प्रयत्न केला. त्यानंतर कीर्तनानेही मदतीसाठी उडी मारली. दुर्दैवाने, तिघींचाही पूलमध्ये बुडून मृत्यू झाला.
तिघींनाही पोहता येत नव्हते. रिसॉर्टच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करताना आणि मदतीसाठी हाका मारताना दिसतात. मात्र, त्यांना मदत करणारे कुणीही तिथे नव्हते. फुटेजमध्ये स्विमिंग पूलच्या आसपास कोणीही नसल्याचे दिसून आले.
मंगळूर पोलीस ठाण्याच्या अहवालानुसार, मुलींचा मृत्यू पाण्यात बुडून अपघाती झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या घटनेचा व्हिडिओ @InformedAlerts या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये घटनेविषयीची माहिती कॅप्शनद्वारे देण्यात आली आहे.
घटनेच्या वेळी रिसॉर्टमध्ये सात कर्मचारी उपस्थित होते. मात्र, मुलींच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही, असे व्हिडिओत दिसत आहे. यामुळे रिसॉर्टच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाले आहेत.